वार्ताहर/ रामदुर्ग
कार्यशाळेत देण्यात येणारी सविस्तर माहिती घेऊन कोणतीही गफलत न करता ग्राम पंचायत निवडणूक यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले. येथील इरम्मा यादवाड सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये सोमवारी ग्राम पंचायत निवडणूक कर्मचाऱयांच्या पहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या शिबिरास भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
जिल्हाधिकारी हिरेमठ पुढे म्हणाले, जिल्हय़ामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून केवळ 200 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल भीती बाळगू नये. मात्र, वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे असून कोरोना प्रतिबंधाच्या सूचनांचे योग्यरितीने पालन करावे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनापासून संरक्षणासाठी लागणाऱया साहित्याचा पुरवठाही करण्यात येईल. प्रशासन आपल्यासोबत असून निर्भयपणे काम करा, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक कर्मचाऱयांनी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेऊ नये. यावेळी मतपत्रिकेद्वारे निवडणूक होत असून अत्यंत जागरुक असावे. एखाद्यावेळी मतदानावेळी गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ वरि÷ांना याची माहिती द्यावी. निवडणूक प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, पीआरओ व एमपीआरओ अशा एकूण 580 निवडणूक कर्मचाऱयांना दहा वर्गखोल्यांमध्ये कार्यशाळा भरविण्यात आली होती. यावेळी ग्रेड-1 तहसीलदार गिरीश स्वादी, इओ मुरलीधर देशपांडे, ग्रेड-2 तहसीलदार सोमशेखर तंगोळ्ळी, सीपीआय शशीकांत वर्मा आदी उपस्थित होते.