वार्ताहर /पणजी
गोमंतक मराठी अकादमीतर्फे,मराठी संगीत नाटय़परंपरेचा वारसा पुढे नेणाऱया गोव्यातील उदयोन्मुख तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या सवेश, साभिनय नाटय़गीत गायन स्पर्धात्मक कार्यक्रमात, सत्तरीतील हर्षा गणपुले हिने स्वयंवर मधील नाथ हा माझा ..हे पद सादर करून पाच हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक पटकावले.तर चार हजार रुपयांच्या द्वितीय परितोषिकाची मानकरी अनुष्का थळी ठरली. तिने स्वयंवर मधील नरवर कृष्णा समान.. या पदाने बहार आणली.
श्रुती सालेलकर हिने स्वयंवर मधील नाथ हा माझा ..हे पद गाऊन तीन हजार रुपयाचे तृतीय पारितोषिक पटकावले. शारदा शेटकर हिने सौभद्रमधील बल सागर तुम्ही..
हे पद प्रभावीपणे गाऊन अडीच हजार रुपयांचे चौथे तर युगा योगिश सांबारी हिने पाणी ग्रहण मधील उगवला चंद्र पुनवेचा हे पद बहारदार पणे सादर करून दीड हजाराचे पाचवे पारितोषिक प्राप्त केले.चिन्मयी कामत हिने रसिल्या शैलीत गायिलेल्या स्वयंवर मधील रूप बली तो नर शार्दूल.. या पदाला सहावे तर दिव्या मावजेकर हिच्या मदानाची मंजिरी मधील ऋतूराज आज वनी आला लज्जतदार पदाला सातवे पारितोषिक देण्यात आले.
इतर स्पर्धक कलाकारातील ,राखी नाईक बोरकर हिने मंदार माला मधील सोहम हर..,गौरांग भांडिये याने मत्स्यगंधामधील देवा घरचे ज्ञात..,सिद्धी पार्सेकर हिने विद्याहरण मधील मधुकर बन बन.., सुरज शेटगावकर याने ययाती देवयानी मधील प्रेम वरदान.., विष्णू गवस याने एकच प्याला मधील परम ग्रहण.., राशी देसाई हिने स्वयंवर मधील मम आत्मा गमला.., लक्ष्मी महात्मे हिने कैकयीमधील सुखद क्षण हा भासे..अशी पदे सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. पुणे येथील ख्यातकीर्त रंगकर्मी रवींद्र खरे यांनी मराठी संगीत रंगभूमीवरील अशा वैभवशाली नाटकांची वैशिष्टय़े आपल्या सुरेख निवेदनातून उलगडून कार्यक्रमाची रंगत खुलविली. नितीन कोरगावकर (तबला) व शिवानंद दाभोलकर (ऑर्गन) सिद्धेश नाईक(ध्वनी संयोजन),जयंत नाटेकर(रंगभूषा) यांनी आपल्या बाजू उत्कृष्ट सांभाळल्या.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागील उद्देश सांगितला. परीक्षक विठ्ठल गावस व दामोदर हेदे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती व उत्स्फूर्त दाद लाभली.