कोल्हापूर / प्रतिनिधी
प्लॉटचा खरेदी-विक्री व्यवहार शासनाच्या तुकडेबंदी – तुकडेजोड कायद्याप्रमाणे प्रांताधिकारी यांच्याकडून नियमित करून तसा आदेश देण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना, या कार्यालयातील लिपिक सागर आनंदराव शिगावकर ( वय 36 रा. रविवार पेठ कोल्हापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी दोन वाजता कसबा बावडा रोडवरील प्रशासकीय इमारतीमधील राधानगरी – कागल जमीन संकलन उपविभागीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार यांनी कागल तालुक्यातील हमिदवाडा याठिकाणी 20 गुंठे जमीन आई व बहिणीच्या नावाने खरेदी केली होती. त्यातील साडेनऊ गुंठे जमीन 2015- 16 मध्ये चौघा जणांना विकली होती. त्यातील अर्धा गुंठे जमिनीचा अर्थबोध होत नव्हता. त्यामुळे ही जमीन खरेदी करणाऱया कुंभार यांच्या नावावर अर्धा गुंठे जमिनीचा सातबारा नोंद व्हावा यासाठी कुंभार व तक्रारदार यांनी तलाठी पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी पाटील यांनी अर्जावर पोच दिली नाही. प्रांत कार्यालय कागल व राधानगरी याठिकाणी तुकडेबंदी व तुकडे जोड कायद्याप्रमाणे, जमिनीच्या मूल्यांकनाच्या 25 टक्के शासकीय दंड भरून हा खरेदी विक्री व्यवहार नियमानुसार करून घेण्याची सूचना त्य़ांनी केली होती. . त्यानुसार तक्रारदार व कुंभार या दोघांनी डिसेंबर 2019 मध्ये प्रांत कार्यालयात अर्ज केला होता.
या अर्जानुसार या कार्यालयातील लिपिक सागर शिगावकर यांनी हे काम करून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार केली. या पथकाने सोमवारी दुपारी दोन वाजता कसबा बावडा रोडवरील प्रशासकीय इमारतीमध्ये, उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा लावून, तक्रारदार यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लिपिक सागर शिगावकर याला रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईत उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फौजदार श्याम बुचडे, मयुर देसाई , रुपेश माने, संदीप पडवळ आदी पथकाने सहभाग घेतला. लिपिक शिगावकर यांच्या रविवार पेठ येथील घराचीही झडती घेण्यात आली.सव्वा लाखाची लाच घेताना महसूल विभागातील लिपिक जेरबंद झाल्याची वार्ता संपूर्ण जिह्यात पसरल्यानंतर खळबळ माजली आहे.