किणये परिसरातील घटनेमुळे घबराट : चालक, क्लिनरनी प्रतिकार करताच तुफान दगडफेक
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावहून गोव्याला जाणारे मालवाहू ट्रक, टेम्पो आदी वाहनांची दोरी कापून माल पळविण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. किणये परिसरात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने अक्षरशः धुडगूस घातला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे गोव्याला माल वाहतूक करणारे वाहन चालक घाबरुन गेले आहेत.
गुरुवारी रात्री 11.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बेळगावहून जाणारे ट्रक, टेम्पोच्या दोरी कापून चोरीचा प्रयत्न झाला आहे. एका वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने वाहनांतील माल लुटण्यात दरोडेखोरांना यश आले नाही. मात्र ट्रकवर दगडफेक करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. किणये ओलांडल्यानंतर चढाव लागतो. चढतीला वाहनांचा वेग कमी होतो. हीच संधी साधून सशस्त्र टोळीतील दरोडेखोरांनी दोरी कापून माल लुटण्याचा प्रयत्न करतात. गेल्या तीन महिन्यांमध्ये असे तीन प्रकार घडले आहेत. किणयेपासून उचवडे क्रॉसपर्यंत सशस्त्र टोळीने अक्षरशः दहशत माजविली आहे.
एका वाहनाची दोरी कापण्याचा प्रकार पाठीमागच्या वाहन चालकाला लक्षात येताच त्याने हॉर्न वाजवून समोरच्या वाहन चालकाला सतर्क केले. त्यामुळे थोडय़ा अंतरावर जावून वाहने उभी करुन चालक, क्लिनर यांनी टॉमी, लोखंडी सळी आदी अवजारे घेवून दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोरी कापणारे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. दरोडेखोरांकडून तुफान दगडफेक
थोडय़ा अंतरावर सुमारे 15 ते 20 जण उभे होते. त्यांनी या वाहनांवर दगडफेक सुरू केली. एका गुन्हेगाराने तर प्रतिकार करणारे चालक व क्लिनरच्या दिशेने विळा फेकला. या घटनेत एक क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. दगडफेक वाढताच घाबरुन गेलेल्या चालक, क्लिनरनी जीवाच्या आकांताने आपल्या वाहनासह तेथून गोव्याच्या दिशेने वाहने हाकली. या घटनेनंतर लगेच 112 क्रमांकाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. तब्बल तासभरानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांनी तेथून पलायन केले होते. एका ट्रकमधील क्लिनरने दिलेल्या माहितीनुसार अंधारात दबा धरुन बसलेल्या गुन्हेगारांकडे कुऱहाड, चाकू, विळे, काठय़ा आदी शस्त्रs होती.
डिसेंबरपासून 4 फेब्रुवारीपर्यंत याच परिसरात तीनवेळा मालवाहू ट्रक लुटण्याचे प्रकार घडले आहेत. यासंबंधी गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तरीही ट्रक लुटणारे गुन्हेगार कोण? याचा शोध घेण्यात पोलीस दलाला यश आले नाही. गुरुवारी रात्रीच्या या घटनेनंतर शुक्रवारी काही व्यापाऱयांनी पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट झाली नाही.