वृत्तसंस्था/ ससेक्स
इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया ससेक्स संघातील वेगवान गोलंदाज मिशेल क्लेडॉन याच्यावर 9 सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. मैदानावर खेळताना त्याने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, क्लेडॉनने आपला गुन्हा सुनावणीवेळी मान्य केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील 23 ऑगस्ट रोजी झालेल्या बॉब विलीस चषक क्रिकेट स्पर्धेतील ससेक्स आणि मिडलसेक्स यांच्यातील सामन्यावेळी हा प्रकार घडला. ससेक्सचा वेगवान गोलंदाज क्लेडॉनने मैदानावर चेंडूची स्थिती आणि आकार बदलण्याचा प्रयत्न केल्याचे कॅमेऱयामध्ये टिपले गेले. मार्क मिल्केन आणि स्मिथ यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट शिस्तपालन आयोगासमोर क्लेडॉनने सुनावणीवेळी हा गुन्हा मान्य केला. इंग्लंडच्या या क्रिकेट शिस्तपालन समितीने क्लेडॉनवर काही नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर 9 सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला.