कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांचे आदेश
प्रतिनिधी / मालवण:
सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 18 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, या निवडणुका पुन्हा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शासनाने पुन्हा सुधारित आदेश देत 18 जानेवारीची निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. सहकार, पणन व वस्त्राsद्योग विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी शनिवारी हे आदेश दिले आहेत.
या संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग आदी उपाययोजनांचा अवलंब करणे तसेच कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश शासनातर्फे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त यांच्या सूचनेने दिले होते. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतून 250 व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना वगळण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता शासनाने पुनश्च प्रारंभ अभियानांतर्गत निर्बंध शिथील करून टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे निवडणुकीस पात्र असणाऱया सुमारे 45 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हय़ातील सर्व प्रकारच्या संस्थांचा समावेश असलेला जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्याबाबत सर्व जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱयांना आदेशित करण्यात आले होते. न्यायालयीन आदेश, निवडणूक प्रक्रियेतील टप्पा व संचालक मंडळ मुदत संपल्याच्या दिनांक आदी बाबी विचारात घेऊन सहा टप्प्यांचा समावेश असलेला जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार आता निवडणूक प्रक्रिया 18 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. आता ही प्रक्रिया 31 मार्चनंतर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.