– गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समितासह दोन हजार संस्थाना पाचव्यांदा मुदतवाढ
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. 31 मार्च 2021 नंतर निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश शनिवारी देण्यात आले. त्यामुळे जिल्हÎातील गोकुळ, जिल्हा बँक, राजारामसह बाजर समिती, पाच साखर कारखाने, कोजिमाशि, प्राथमिक शिक्षक, गर्व्हमेंट सर्व्हंट बँक, जिल्हा परिषद सोसायटीसह अन्य दोन हजार संस्थांच्या विद्यामान संचालक मंडळास मुदवाढ मिळालेली आहे.
250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी चारच दिवसापूर्वी काढले होते. सोमवार दि. 18 पासून प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र नव्या आदेशाने ही प्रक्रियाच थांबली आहे.
महात्मा फुले कर्जमाफीचे काम सुरळीत होण्यासाठी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 27 जानेवारी 2020 पर्यंत तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर देशभर कोरोनाची लाट आली. त्यामुळे तीन तीन वेळा तीन-तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला. शनिवारच्या आदेशाने पाचव्यांदा मुदतवाढ मिळालेली आहे.
सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया होणार असल्याने पूर्व तयारीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जोरदार तयारी केली होती. शनिवारी कार्यालयीन सुट्टी असतानाही जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्यासह कर्मचारी कार्यालयात कामात व्यस्त होते. मात्र रात्री उशिरा निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश प्राप्त झाल्याने सुट्टी दिवशी केलेल्या कामावर पाणी फिरले.
कोरोनाच्या सावटामुळे वार्षिक सभांवर निर्बंध आणले होते. 31 मार्चपर्यंत सभा घेण्यास मुदतवाढ दिली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने काही संस्थांची वर्षिक सभा घेण्याची तयारी सुरु केली होती. मात्र आता निवडणुकाच तीन महिन्यासाठी पुढे गेल्याने मार्च पर्यंत वार्षिक सभाही सोयीनुसार घेण्यात येतील, मात्र तोंडवर निवडणूक असल्याने या संभांमध्ये निवडणुकीचे सावट उमटणार आहे.
गोकुळची प्रारुप यादी स्थगित, जिल्हा बँकेचे ठराव थांबले
गोकुळसाठी ठराव दाखल करुन अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. 3659 पैकी 3654 ठराव निवडणूक विभागाकडे दाखल झाले होते. ज्या ठप्प्यावर निवडणुका थांबल्या आहेत तेथून पुढील प्रक्रिया सुरु करण्यात यावी, असे आदेश प्राधिकरणाने दिल्याने सोमवारी सभासदांची प्रारुप यादी प्रसिद्ध होणार होती. तर जिल्हा बँकेचे ठराव जमा करणे सुरु झाले होते. हे कामाकाज तीन महिन्यांसाठी स्थगित झाले आहे.
आतापर्यत मुदतवाढ
1- 27 मार्च 2020
2-18 मार्च 2020
3- 17 जून 2020
4-24 सप्टेंबर 2020
5- 16 जानेवारी 2021