मुख्यमंत्री बसवराज बोम्माई : बेंगळुरात सहकाररत्न पुरस्कारांचे वितरण
प्रतिनिधी / बेंगळूर
देशातील सहकार क्षेत्रात राज्याला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. बेंगळूरच्या केंगेरी येथे आयोजित ‘सहकाररत्न पुरस्कार’ वितरण समारंभात ते बोलत होते. सध्या देशात महाराष्ट्र, गुजरात सहकार क्षेत्रात अग्रस्थानी असून आगामी दिवसांत कर्नाटकातील सहकार क्षेत्र प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, आशिया खंडात पहिल्यांदाच कर्नाटकात सहकार संघ प्रारंभ झाला असून आपल्या राज्यातील सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी भरपूर संधी आहेत. दूध उत्पादक सहकारी संस्थेची वार्षिक उलाढाल 36 हजार कोटी रुपये इतकी असून शेतकरी कुटुंबांसाठी आधारस्तंभ आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने क्षीर समृद्ध बँक स्थापण्यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रात विकासाची क्रांती घडणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती-जमातींनी सहकार संघात नोंदणी केल्यास त्यांचे शुल्क सरकार भरणार आहे. याचबरोबर राज्य सरकारकडून महिलांनी विविध उद्देशीय संघ स्थापल्यास 90 टक्के रक्कम भरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले. यावेळी बोलताना सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी, यंदाच्यावर्षी शेतकऱयांना 20,810 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले जाईल. पुढच्यावर्षी 23 हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे ध्यये ठेवले आहे. म्हैसूर जिल्हय़ाच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 402 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी, यशवंतपूर मतदारसंघासाठी 4 नवी पोलीस स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. 11.40 केटी रुपयांच्या खर्चातून ही स्थानके निर्माण करण्यात येत असून अर्थसंकल्पात 100 नवी स्थानके बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, सहकार क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजाविलेल्या भीमण्णा खंड्रे यांच्यासह 60 जणांना यंदाचा सहकाररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर दि. डॉ. पुनीत राजकुमार आणि केरेगौडा सिद्धलिंगप्पा यांना मरणोत्तर सहकाररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, के. गोपालय्या, गोविंद कारजोळ, आनंद सिंग, भैरती बसवराज, खासदार सदानंद गौडा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.