शिरवळच्या कामगार पुरवणाऱ्या संस्थेला तब्बल 11 लाखाची लाच मागितली होती
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात कामगार आयुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्त संजय महानवर यांनी तब्बल 11 लाख रुपयांची लाच शिरवळ येथील एका कामगार पुरवणाऱ्या संस्थेला मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपये आज त्याच्या निवासस्थानी स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महानवर यांना जेरबंद केले. सातारा पालिकेच्या उपमुख्याधिकारी यांच्या कारवाईनंतर सर्वांत मोठी कारवाई केल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा येथे रविवार पेठेत कामगार आयुक्त कार्यालय आहे. तेथे कामगारांची नोंदणी करण्यात येते. शिरवळ येथील कामगार पुरवणाऱ्या संस्थेने कामगार नोंदणी करण्यासाठी वारंवार फेऱ्या मारल्या. तेव्हा त्या संस्थेच्या अध्यक्षांना कामगार आयुक्त कार्यालयातले सहाय्यक कामगार आयुक्त संजय महानवर हे सतत काही कारणे सांगून त्रुटी काढायचा.त्यावर एकदा 11 लाख रुपये मागणी केली तेव्हा 8 लाख देतो असे त्या अध्यक्षांने कबुली दिली.
व्यवहार ठरल्याप्रमाणे 2 लाख सुरुवातीला देण्यापूर्वी त्यांनी याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली. दि. 6 रोजी ते दोन लाख रुपये तो अध्यक्ष महानवर याच्या घरी गेला.त्यावेळी सापळा रचला होता. तो सापळा पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोहवा शिंदे, पो ना ताटे, खरात पो कॉ काटकर, भोसले यांनी रचून अलगद संजय शामराव महानवर , वर्ग 1, पद – सहायक कामगार आयुक्त याला 2 लाख रुपये स्वीकारताना त्याच्याच घरात संभाजीनगर येथे अटक केली. दरम्यान, सातारा पालिकेच्या लाच प्रकरणानंतर मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.