दीर्घ स्थलांतर करण्याचा प्रकार केवळ पक्ष्यांकडूनच नव्हे तर फुलपाखरांकडूनही होत असतो. अलिकडेच झालेल्या एका संशोधनात याची पुष्टी झाली आहे. फुलपाखरांची एक प्रजाती हजारो किलोमीटरचे अंतर कापून सहारा वाळवंट ओलांडत असल्याचे आढळून आले आहे. पेंटेड लेडी नावाच्या या प्रजातीची फुलपाखरं पहिल्यांदाच मोठय़ा संख्येत 12-14 हजार किलोमीटरचा प्रवास करताना दिसून आली आहेत.
द प्रेसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. आफ्रिकी सवानामध्ये हिवाळा आणि उत्तर आफ्रिकेत वसंत ऋतूदमयान अनुकूल हवामान निर्माण झाल्याने मोठय़ा संख्येत पेंटेड लेडी फुलपाखरांचे स्थलांतर होत असते. पेंटेड लेडी प्रजातीची फुलपाखरांना आफ्रिकेत योग्य आहार उपलब्ध होत असल्याने त्यांचे प्रमाण प्रचंड वाढते. याचमुळे त्यांचे स्थलांतर सुरू होत त्या युरोपपर्यंत पोहोचतात.
हवामानाचा पेंटेड लेडी फुलपाखरांवर मोठा प्रभाव पडत असतो. आफ्रिका आणि पश्चिम युरोपमध्ये नियमित स्वरुपात वाहणारे अनुकूल वारे या पेंटेड लेडी फुलपाखरांना आंतरखंडीय प्रवास करण्याची संधी देतात. फुलपाखरं दिवसभर न थांबता प्रवास करत असतात. सहारा वाळवंटात ही फुलपाखरं रात्री आराम करतात असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे.
पेंटेड लेडी फुलपाखरांना समुद्रसपाटीपासून 1-3 किलोमीटरवरून उडायचे असते. त्यांचा वेग 6 मीटर प्रतिसेकंद इतका असतो. सलग 40 तासांचे न थांबता उड्डाण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात शारीरिक बळ असते.