काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची माहिती
प्रतिनिधी / सातारा :
येवू घातलेल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार आहे. त्याकरता प्रदेश पातळीवरुन जो निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या लागलेल्या निवडणूका या पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने प्रबळ असे उमेदवार देण्यासाठी काँग्रेसच्या निरीक्षकांकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 रोजी त्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. इच्छूकांच्या मुलाखती घेतल्यानंतर निवड यादी ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात लागलेल्या सहा नगरपंचायतीच्या निवडणूकांच्या अनुषंगाने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये त्या त्या तालुक्यातील अध्यक्षांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोरेगाव नगरपंचायतीच्या इच्छूकांच्या मुलाखती कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीत जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, प्रदेश निरीक्षक अचूत मते, जिल्हा निरीक्षक बाबूराव शिंदे आणि श्रीनिवास थोरात यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहेत. दुपारी 1 वाजता या मुलाखती होणार आहेत. लोणंद नगरपंचायतीसाठी राधाकृष्ण मंगल कार्यालय लोणंद येथे दुपारी 11 वाजता प्रदेश निरीक्षक सोमनाथ दौंडकर आणि जिल्हा निरीक्षक मनोहर शिंदे, सर्फराज बागवान, विद्या थोरवडे हे घेणार आहेत. तर खंडाळा नगरपंचायतीसाठी दुपारी 2 वाजता प्रदेश निरीक्षक सोमनाथ दौंडकर, जिल्हा निरीक्षक मनोहर बर्गे, धनश्री महाडिक, तालुकाध्यक्ष एस.वाय.पवार हे खंडाळा काँग्रेस कमिटीत घेण्यात येणार आहेत. वडूज नगरपंचायतीसाठी दुपारी 2 वाजता प्रदेश निरीक्षक रवींद्र देशमुख, सह प्रभारी कवीश्वर, जिल्हा निरिक्षक एम.के.भोसले हे अशोकराव गोडसे यांच्या निवासस्थानी घेण्यात येणार आहेत.
दहिवडी नगरपंचायतीसाठी प्रदेश निरीक्षक रवींद्र देशमुख, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी कवीश्वर, जिल्हा निरीक्षक ऍड. दत्तात्रय धनावडे, राजेंद्र शेलार हे केदारेश्वर पतसंस्था येथे सकाळी 11 वाजता मुलाखती घेणार आहेत. पाटण नगरपंचायतीसाठी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हा निरीक्षक बंडानाना जगताप, प्रदीप जाधव, राहुल चव्हाण हे माजी सभापती पवार यांच्या निवासस्थानी इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहेत. इच्छूकांनी आपला अर्ज निवड समितीकडे सादर करावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.