वार्ताहर/ कराड
शनिवार पेठेतील खरेदी विक्री पेट्रोल पंप परिसरातील दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या 75 वर्षीय कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ठाणे येथून आलेल्या रुक्मिणी विहारमधील 39 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवशी शहरात सहा कोरोनाबाधित आढळल्याने नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी येथील खरेदी विक्री पेट्रोलपंपाच्या परिसरातील 75 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या घरातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील 65, 45 व 23 वर्षीय महिला तसेच 22 व 24 वर्षीय पुरूषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगरपालिका व प्रशासनाने या परिसरात यापूर्वीच कंटेनमेंट झोन तयार केला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने नियमित औषध फवारणी करण्यात येत आहे. तर नागरी आरोग्य केंद्राने होम टू होम सर्व्हेचे काम सुरू केले आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
ठाणे येथे ‘बेस्ट’मध्ये कामाला असणारा 39 वर्षीय तरुण 22 जून रोजी मोटरसायकलवरून रुक्मिणी विहार येथे आला होता. 23 रोजी त्याने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन ठाण्याहून आल्याची नोंद केली. तसेच घरातील वरच्या मजल्यावरील स्वतंत्र खोलीत स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले. 29 रोजी त्यांच्या घशात खवखवू लागले तसेच अशक्तपणा आल्याने तो उपजिल्हा रुग्णालयात गेला. यावेळी त्याला फार्मसी कॉलेज येथे पाठवून त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील 9 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
खरेदी विक्री पेट्रोल पंप परिसरात यापूर्वीच मायक्रो कंटेनटमेंट झोन करण्यात आला आहे. रुक्मिणी विहार परिसरात बुधवारी मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आला. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दोन्ही ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. तर नागरी आरोग्य विभागाच्या वतीने दोन्ही ठिकाणच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.