फिर्याद दाखल करून घेण्यासही केली होती टाळाटाळ
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन काळात फुलबाग गल्ली येथील गोदामाचे कुलूप फोडून 1 कोटी 94 लाख 51 हजार 134 रुपयांच्या इलेक्ट्रिक वस्तूंची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणाला सहा महिने उलटले तरी अद्याप तपास लागलेला नाही. वारंवार पोलीस अधिकाऱयांच्या भेटी घेऊन संबंधितांनी अर्जविनंत्या करूनही प्रतिसाद मिळत नाही, अशी स्थिती आहे.
शास्त्राrनगर येथील मोहनलाल परमार हे फोर्ट रोडवर मोहन केबल हाऊस हे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान चालवतात. साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी फुलबाग गल्ली येथे दोन गोदाम घेतली आहेत. दि. 31 मे 2020 ते 1 जून 2020 च्या सकाळी 10 या वेळेत चोरटय़ांनी त्यांच्या गोदामातील ऍल्युमिनियम व तांब्याची वायर बंडले, स्वीचगिअर बॉक्स अशा मोठय़ा प्रमाणात साहित्य चोरले आहे.
सुरुवातीला मार्केट पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. तत्कालिन पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दि. 24 जून 2020 रोजी चोरीच्या 23 दिवसांनंतर फिर्याद दाखल करून घेण्यात आली. यावेळी मोहनलाल परमार यांना शिवीगाळ करण्याचा प्रकारही पोलीस स्थानकात घडला. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस स्थानकाच्या पायऱया झिजवूनही तपासात कसलीच प्रगती झालेली नाही.
पोलीस स्थानकात व्यवस्थित वागणूक मिळत नाही. चोरी प्रकरणाचा तपास होत नाही म्हणून मोहनलाल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनाही पत्रे पाठविली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे. 2 कोटी रुपयांहून अधिक माल गोदामात असताना या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नव्हते. एखादा रखवालदारही नेमण्यात आला नव्हता.
2 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरीला गेल्या तरी खरा चोर कोण? याचा तपास केला जात नाही, अशी स्थिती आहे. मोहनलाल यांनी या संबंधीचा सर्व तपशील पोलीस अधिकाऱयांना दिला आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगार कोण? याचा छडा लावण्याची मागणी मोहनलाल परमार यांनी केली आहे.