कोणतीही भाषा सहिष्णू असते. माणसांवर प्रेम करताना चांगले आणि वाईट असा भेदभाव करीत नाही. भाषा माणसांवर प्रेम करते म्हणजे काय करते? एखादा माणूस तिला आवडला तर त्याचा सद्गुण आणि त्याचे नाव एकमेकांमध्ये विलीन करते. मग तो माणूस त्या भाषेत अजरामर होतो. उदाहरणार्थ, महाभारतातला भीष्म. त्याने एक प्रतिज्ञा केली आणि जन्मभर पाळली. त्यामुळे नंतरच्या काळात कोणी अशी ठाम प्रतिज्ञा केली तर तिला लोक भीष्मप्रतिज्ञा म्हणू लागले. देखण्या माणसाला मदनाचा पुतळा, आदर्श जोडप्याला लक्ष्मीनारायणाचा जोडा असे आपण म्हणतो. दानशूर माणूस कर्णाचा अवतार असतो. ग्रीक महाकाव्यात युलिसिस राजाला मिनर्व्हा नावाची देवता वेळोवेळी मदत करते. अशा वेळी ती मेंटोर नावाच्या पुरुषाचे रूप घेते. हा मेंटोर राजाचा मित्र, मार्गदर्शन असतो. त्यावरून इंग्रजीत सन्मित्र-मार्गदर्शकाला लोक मेंटोर म्हणू लागले. चांगली माणसं-कृत्यं अशी भाषेत अजरामर होऊन जातात.
वाईट माणसं देखील भाषेत अजरामर झालेली दिसतात. झोपाळू माणसाला कुंभकर्णाचा अवतार, खादाड माणसाला बकासुर, कपटी माणसाला शकुनी, सतत छळणाऱया माणसाला राशीला लागलेला शनी, दारुडय़ाला तळीराम, दुर्गुणी मुलावर आंधळे प्रेम करणाऱया बापाला धृतराष्ट्र संबोधण्याची प्रथा आहेच. पण दुसऱयावर खोटेनाटे आरोप करून त्याला उठवणाऱया माणसाचे असे नामकरण अद्याप झालेले नाही.
सत्तरेक वर्षांपूर्वी अमेरिका गाजवणाऱया एका ‘महापुरुषाच्या कृपेने’ इंग्रजीत ते झाले आहे. चाळीस-पन्नासच्या दशकात अमेरिकेत जोसेफ मॅकार्थी नावाच्या सिनेटर ऊर्फ खासदाराने असा धुमाकूळ घातला होता. या मॅकार्थीने अनेकांवर बेछूट आरोप केले. सुरुवातीला त्यातून खळबळ माजली. आपल्याकडे असो की गोऱयांच्या देशात, उथळ आणि खळबळजनक गोष्टी माणसाला काही काळ नक्की भुलवतात. त्यातून काही लोकांना प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी माध्यमांना टीआरपी मिळतो. पण या भुलवणाऱया गोष्टी स्वतःच्या अंगाशी आल्या की माणसांचे डोळे उघडतात. मॅकार्थीच्या बेछूट आणि बिनबुडाच्या आरोपांमुळे अनेक कलाकार आणि इतर मान्यवर बदनाम झाले. काहींची कारकीर्द लयाला गेली. काही लोक आयुष्यातून उठले. त्यावरून तिकडे अशा खोटारडय़ा आरोपांना, लोकांना बदनाम करून आयुष्यातून उठवणाऱया उद्योगांना मॅकार्थीझम असे विशेषण प्राप्त झाले.
आपल्याकडेही हे सध्या चालू आहेच. पण महाराष्ट्राचा मॅकार्थी कोण? भारताचा मॅकार्थी कोण? हे ठरल्याशिवाय मॅकार्थीझमला भारतीय भाषेत प्रतिशब्द जुळवता येणार नाही!