वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे सह्याद्री पट्टय़ात धवडकी, माडखोल, विलवडे भागात झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली. तेथील कुटुंबांना ताडपत्री व अन्य जीवनावश्यक वस्तू देत त्यांनी मदतीचा हात दिला.
भोसले म्हणाले, तालुक्यातील अनेक भागात मोठय़ा प्रमाणात दुकानदार, व्यापारी तसेच अनेक कुटुंबियांचे घरातील सर्व सामान पाण्यात खराब झाले. तसेच वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी, यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यात येईल. यावेळी सरपंच संजय शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य राजू देसाई, सिद्धेश शिरसाट, पोलीस पाटील उदय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष जोईल, शहराध्यक्ष देवा टेमकर, निहाल शेख, इफ्तिकार राजगुरू, ओमकार पानोळकर, आबा धडाम, अरुण म्हाडगूत आदी उपस्थित होते.
या भागातील व्यापारी वर्धन तसेच आबा धडाम यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. रात्री एकच्या सुमारास पाणी रस्त्यावर आले तेव्हा सर्वप्रथम धडाम यांनी या भागातील लोकांना सतर्क केले. त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे धडाम यांचे भोसले यांनी कौतुक केले. तसेच या भागातील पोलीस पाटील उदय राऊत, ओंकार पानोळकर यांच्या साठ गणेशमूर्ती पाण्यात विरघळून गेल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ ताडपत्री व अन्य मदत करण्यात आली. धवडकी, माडखोल, विलवडे, कलंबिस्त भागात शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. त्याबाबत कृषी विभागाकडे भरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.