वार्ताहर/ ताम्हाने
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात विनापरवाना शस्त्रासह घुसलेल्या संगमेश्वर तालुक्यातील तिघा तरूणांना चांदोली वन्यजीव विभागाच्या तपास पथकाने ताब्यात घेवून अटक केली. या कारवाईदरम्यान शुक्रवारी एकाला तर शनिवारी दोघांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील संदीप तुकाराम पवार (37, रा. हातीव, गोठणे पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर (33, रा. मारळ) व अक्षय सुनील कामतेकर (19, रा. मारळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या बाबत चांदोली वन्यजीव विभागामार्फत देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार, अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रप कॅमेऱयात 31 मार्च रोजी तिन्ही आरोपी कैद झाले होते. यानंतर या बाबतचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी तत्काळ जारी करून वनपरिक्षेत्र कार्यालयास घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयाला माहिती देवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यानचे विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला.
विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे व फिरते पथकाचे शिशूपाल पवार यांना पाचारण करण्यात आले. त्याप्रमाणे चांदोली येथे तपास पथक तयार करण्यात आले व पुढील तपासाची दिशा ठरवण्यात आली. तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम दिशेला उतारावरील आसपासच्या गावात जावून चौकशी करण्यास सुरूवात केली. यावेळी खबऱयाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 1 एप्रिल रोजी संगमेश्वर तालुक्यातील हातीव (गोठणे पुनर्वसन) गावात जावून चौकशी केली. येथे सखोल चौकशी केली असता संशयित आरोपी आढळला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाना शिकारीच्या उद्देशाने अपप्रवेश केल्याचे मान्य केले.
2 एप्रिल रोजी या प्रकरणात आणखी दोन आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार चौकशीअंती तालुक्यातील मारळ येथील 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. संगमेश्वर तालुक्यातील संदीप पवार, मंगेश कामतेकर व अक्षय कामतेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी वनविभागाच्या हद्दीत शस्त्रासह शिकारीसाठी गेल्याने कॅमेऱयात आल्याचे कबूल करून केलेला गुन्हा मान्य केला आहे. यानंतर वन्यजीव कायदा 1972 अन्वये अटक करून रत्नागिरीच्या न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले असता तिन्ही आरोपींना 5 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये संशयास्पद छायाचित्रे आढळून आल्याने अधिकचे धागेदोरे हाती लागण्याची चांदोली वन्यजीव विभागाने शक्यता वर्तवली आहे. ही कारवाई चांदोली वन्यजीव विभागाच्या तपास पथकामार्फत करण्यात आली.
ही कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, चांदोली वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे, फिरते पथकाचे शिशूपाल पवार, वनपाल गारदी, वनरक्षक दणाने, वाहनचालक सर्वश्री सचिन, अनंत, सागर तसेच वन्यजीवप्रेमी प्रतिक मोरे यांनी केली. या कारवाईसाठी रत्नागिरी वनविभागाचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, वनक्षेत्रपाल प्रियंका लगड, देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे व त्यांचे अधिनस्त कर्मचारी, पंचक्रोशीतील पोलीस पाटील व सरपंच यांची मदत लाभली.