प्रतिनिधी / बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विरोधी गटाकडून नेतृत्वबदलासाठी हायकमांडवर दबाव घालण्यात येत असतानाच येडियुराप्पांच्या समर्थक गटाने सहय़ांचे पत्र हायकमांडला पाठविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येडियुराप्पा यांनी सहय़ा जमविण्याऐवजी मतदारसंघांतील कोरोना नियंत्रण कामांवर लक्ष केंद्रीत करा, अशी परखड सूचना दिली आहे.
कोरोना संसर्गामुळे राज्यातील जनता संकटात असताना भाजपमधील प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघात कोरोना नियंत्रण कामांसाठी प्राधान्य द्यावे. कोणीही सहय़ा जमाविणे किंवा राजकीय विधाने करू नयेत, अशा विनंतीचे ट्विट येडियुराप्पा यांनी केले आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांनी देखील गटबाजीचे राजकारण करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
कोरोना संकटकाळात राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी हायकमांडने सूचना केल्यास राजीनामा देण्यास तयार असल्याचे विधान रविवारी केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे येडियुराप्पा यांच्या समर्थक-विरोधक गटातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.