संशयित दोन तासांच्या आत गजाआड
प्रतिनिधी / म्हापसा
सांकवाडी-हडफडे येथील द पार्क या हॉटेलच्या आवारात शनिवारी मध्यरात्रीनंतर तेथील कर्मचाऱयांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या भांडणात दोडामार्ग-सिंधुदुर्ग येथील विश्वनाथ सदाशिव गांवस (28 वर्षे, मूळ-पिकुळे) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. संशयिताचे नाव रामभरोसे निषाद (उत्तर प्रदेश) असून खुनाची माहिती मिळताच हणजुण पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत त्याला अटक करण्यात यश मिळविले आहे.
रामभरोसे निशाद याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक सुरज गांवस वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.
वाढदिवसाच्यानिमित्ताने सुरु होती पार्टी
हणजुण पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांकवाडी-हडफडेतील त्या हॉटेलात काम करणारा विश्वनाथ गांवस शनिवारी रात्री आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने रामभरोसे निषाद आणि अन्य मित्रांसोबत दारु पित बसला होता. यावेळी गांवस व रामभरोसे यांच्यात बाचाबाची झाली. परंतु प्रकरण हातघाईवर येण्याआधीच सहकारी मित्रांनी त्यांना वेगळे करीत झोपण्यासाठी वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये पाठवून दिले.
मध्यरात्रीनतंर रामभरोसेने साधला डाव
मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या सुमारास संशयित रामभरोसे हा विश्वनाथ गांवस झोपलेल्या खोलीपर्यत आला. तो गाढ झोपेत असल्याची संधी साधून धारधार चाकूने त्याच्यावर वार केले. वार छातीवर तसेच मानेवर लागल्याने विश्वनाथचा बिछान्यातच मृत्यू झाला.
विश्वनाथचा भोसकून खून केल्यानंतर रामभरोसे निषाद काळोखाचा फायदा उठवित आपल्या खोलीवर आला आणि काही घडलेच नसल्याच्या आविर्भावात खोलीत झोपी गेला.
खोलीतून रक्त आल्याने घटना उघडकीस
विश्वनाथच्या खोलीतून रक्त येत असल्याचे दृष्टीस पडल्याने तेथील सुरक्षा रक्षकाने आरडाओरड करीत विश्वनाथच्या इतर सहकाऱयांना जागे केले. त्यानंतर घटनेची माहिती स्थानिक हणजुण पोलिसांना देण्यात आली.
पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविला आहे. रामभरोसे निषाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने विश्वनाथच्या खुनाची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीच रुजू झाला होता कामावर
पिकुळे (शाळेचीवाडी) येथील सर्वसामान्य कुटुंबात विश्वनाथचा जन्म झाला. आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्याला वाढविले. बारावीनंतर त्याने आयटीआय पूर्ण केले होते. प्रथम तो वेर्णा येथे नोकरीला होता. तर सध्या हडफडे येथील हॉटेलात सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. आठ दिवसांपूर्वीच तो कामावर हजर झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, धाकटी बहीण आहे. त्याचे आई-वडील मोलमजुरी करतात. तर छोटी बहीण दोडामार्ग येथे एका सुपर मार्केटमध्ये कामाला जाते.