प्रतिनिधी /वास्को
नाटय़मय राजकीय घडामोडीत सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांचे सरपंचपद धोक्यात आलेले आहे. अकरापैकी नऊ पंच सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. सरपंच रमाकांत बोरकर व त्यांची पत्नी पंच सुनिता बोरकर ही दोघेच ठरावाच्या विरोधात राहिलेले आहेत. याअविश्वास ठरावावर येत्या दि. 12 रोजी निर्णय होणार आहे.
सरपंच रमाकांत बोरकर यांची मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सरपंचपदी वर्णी लागली होती. सरपंचपदाच्या शर्यतीत नसलेल्या बोरकर यांना गिरीष पिल्ले यांना हटवून अचानक सरपंचपदी बसवण्यात आले होते. वास्तवीक मागच्या पंचायत निवडणुकीत रमाकांत बोरकर व त्यांच्या पत्नी सुनिता बोरकर पंच म्हणून निवडून आल्या होत्या. बोरकर यांनी मागच्या तीस वर्षांत अनेक वर्षे सरपंचपद भुषवीले होते. मात्र कुटुंबातील दोघे निवडून येऊनही ते तीन वर्षांहून अधिक काळ सरपंचपदाच्या शर्यतीपासून दूरच राहिले होते. मात्र तरीही मागच्या सप्टेंबरमध्ये त्यांना पुन्हा सरपंचपदाची लॉटरी लागली होती. सध्या त्यांचे सरपंचपद धोक्यात आलेले आहे. अकरापैकी नऊ सदस्यांनी त्यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गटविकास अधिकाऱयांसमोर अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव येत्या 12 रोजी चर्चेस आल्यास रमाकांत व त्यांची पत्नी सुनिता बोरकर यानाच या ठरावाला विरोध करावा लागणार आहे. यानाटय़मय राजकीय घडामोडींमुळे कुठ्ठाळी मतदारसंघातील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.