प्रतिनिधी /वास्को
सांकवाळ येथील महामार्गावर सोमवारी रात्री दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सुदैवाने कुणी गंभीर जखमी झाला नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पणजीहून वास्को दिशेने जाणाऱया स्कॉडा कार व दाबोळी विमानतळावरून पणजीच्या दिशेने जाणाऱया स्विफ्ट डिझायर कार यांच्यात हा अपघात झाला. एका बाजुला रस्ता खोदलेल्या ठिकाणी एक गाय आडवी आल्याने हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने मोठा आवाज झाला. या आवाजामुळे स्थानिक लोक घटनास्थळी धावून आले. या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला भूमीगत वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. आणि खोदकाम केलेली माती रस्त्याच्या बाजूलाच ठेवल्याने या ठिकाणी रस्ता अरूंद बनलेला आहे. अरूंद रस्ताच या अपघाताला कारण असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या बाजुला करण्यात आलेले खोदकाम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी होत आहे.