प्रतिनिधी / वास्को
आपल्या खासगी मालमत्तेत गांजाच्या रोपटय़ांची लागवड करणाऱया 63 वर्षीय वृध्दाला वेर्णा पोलिसांनी अटक केली. सदर वृध्द व्यक्तीचे नाव इरीन रॉड्रिक्स असे असून ही व्यक्ती सांकवाळच्या जुन्या चर्चजवळील राहणारी आहे.
सांकवाळ येथे एक व्यक्ती गांजाच्या रोपांची आपल्या घराजवळच लागवड करीत असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेर्णा पोलिसांनी सांकवाळ येथील जुन्या चर्चजवळील एका घरावर धाड घालून शहानिशा केली असता गांजा लागवडीची माहिती खरी ठरली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 63 वर्षी रॉड्रिक्स ही व्यक्ती आपल्याच मालमत्तेत बेकायदेशीररीत्या गांजांची लागवड करीत होती. त्याने या रोपटय़ांची बागच तयार केली होती. या बागेत पोलिसांना 3 किलो 762 ग्रॅम गांजा उत्पादन आढळून आले. या उत्पादनाची किंमत 3 लाख 76 हजार रूपये आहे. पोलिसांनी हे बेकायदा गांजा उत्पादन जप्त केले आहे. पोलिसांनी इरीन रॉड्रिक्स याला एनडीपीएस कायदय़ाखाली गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
गांजा लागवड प्रकरणी अटक केलेला इरीन रॉड्रिक्स कधी पासून हा प्रकार करीत होता व तो कुठे हे उत्पादन विकत होता ही माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नाईक या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.