हिंदी राष्ट्रगीताच्या सीडीचे होणार उद्घाटन
प्रतिनिधी/ पणजी
सांखळी येथे आज एका भव्य कार्यक्रमात ‘देशबने समृद्ध’ या एका हिंदी राष्ट्रगीताची सीडी राष्ट्राला अर्पण करण्यात येत आहे. या गीताचे वैशिष्टय़ म्हणजे 6 मिनिटांच्या या गीतामध्ये ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ असा नारा लगावलेला आहे. गीत रचना संतोष च्यारी यांनी केली आहे तर संगीत दिग्दर्शनाची बाजू व गायक म्हणून डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी बाजू सांभाळलेली आहे.
हिंदी देशभक्तीपर गीत गोमंतकीय कवी व सांखळीचे सुपुत्र संतोष च्यारी यांनी शब्दबद्ध केलेले आहे. यापूर्वी त्यांनी पणजी आकाशवाणी केंद्रावर आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला होता. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही सुरेल गीत तयार करुन त्यांना ते पणजीतील विराटसभेट सादर केले होते. आता संतोष च्यारी यांनी गेले वर्षभर व खास करुन कोविडच्या काळात गीत रचविले व डॉ. पूर्णानंद च्यारी यांना सादर केले. त्यानंतर दोघांनी मिळून चाल तयार केली आणि अनेक स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने हे गाणे माशेल येथील एका स्टुडियोमध्ये बसविले. त्याचबरोबर त्याचे व्हिडिओ शुटींगही तयार केले.
गीतात संपूर्ण राष्ट्राच्या विविध पैलुंचा समावेश
हे गाणे तयार करताना संतोष च्यारी यांना वेगवेगळ्य़ा संकल्पना सूचल्या व त्यानंतर ‘जय जवान ज किसान’ अशी घोषणा देणारे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्राr, एक पाऊल पुढे टाकून अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ‘जय जवान जय किसान व जय तंत्रज्ञान’ अशी घोषणा केली तर या सर्वांपुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय तंत्रज्ञान व जय अनुसंधान’ अशी मोठी घोषणा केली. प्रस्तुत गीतामध्ये या सर्वांचा उल्लेख अत्यंत शास्त्रशुद्धरित्या संतोष च्यारी यांनी केलेला आहे. हे राष्ट्रगीत रचताना च्यारी यांना त्यात संपूर्ण राष्ट्राला समाविष्ट करुन घ्यावयाचे होते. त्यामुळे भारतीय सण, परंपरा, भारतीय पारंपरिक व अत्याधुनिक शेती, भारतीय पारंपरिक वैद्यक शास्त्र, आयुर्वेद व आधुनिक ऍलोपॅथी शास्त्र वगैरेच्या गोषवारा त्यांनी घेतलेला आहे.
गीत पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविण्याची इच्छा
या व्हिडियो गीतामध्ये भारतीय वैज्ञानिक, अवकाश यान तसेच संशोधन कार्य, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी, आजवर देशात झालेल्या सर्व पंतप्रधानांच्या कार्याचा त्यात उल्लेख झालेला आहे व त्यांचे प्रत्यक्ष दर्शन त्यातून होते. संपूर्ण देशाला एकत्रित जोडण्याचे कार्य या ‘देशबने समृद्ध’ या राष्ट्रगीतातून होते. जसजसे हे गीत पुढे जाते तस तसे ऐकणाऱया व्यक्तीमध्ये रोमांच उभे राहातात. एवढे प्रेरणादायी राष्ट्रभक्तीचे स्फुरण देणारे गीत आहे. डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी स्वतः गाउन दिलेल्या दिग्दर्शनाने तर कमालच केलेली आहे. या गीताची निर्मिती करताना संतोष च्यारी यांना बराच खर्च आलेला आहे मात्र हे गीत त्यांना पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा आहे.
आज सायंकाळी उद्घाटन
आज रविवार दि. 24 जानेवारी रोजी सायं. 4 वा. कारापूर – तिस्क, सांखळी येथे शर्वराज फर्मवर होणाऱया या समारंभात सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते हे गीत राष्ट्राला समर्पित केले जाईल. या कार्यक्रमास स्थानिक आमदार प्रविण झाटये, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलक्षणा सावंत, माजी आमदार प्रताप गावस हे सर्वजण खास पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. या शिवाय माहिती संचालक सुधीर केरकर, जि. पं. सदस्य महेश सावंत, कारापूरचे उपसरपंच दामोदर गुरव, पंच सदस्या रश्मी रा. नाईक, पंच सदस्य दत्तप्रसाद खारकांडे, माजी सरपंच अपर्णा राणे सरदेसाई, हिंदीच्या प्रा. डॉ. सोनिया शिरसाट तसेच शर्वराज फर्मचे रमापती पित्रे उपस्थित राहातील.
विश्वकर्मा क्रिएशन सांखळी आणि सांखळी मित्र परिवार या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कवी संतोष च्यारी यांनी केले आहे.