प्रतिनिधी / सांगरुळ
संचारबंदी आदेशामुळे सांगरूळ परिसरातील गावांमधून शिवजयंती कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता घरगुती स्वरूपात साजरी करण्यात आली. तिथीनुसार शिवजयंती आजच्या दिवशी सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते . शिवजयंतीच्या आदल्या रात्रीपासूनच गावोगावच्या चौकाचौकातून शिवाजीमहाराजांचे पोवाडे गाणाऱ्या ध्वनिफिती मुळे सर्वत्र परिसर दणाणून सोडला जातो .शिवज्योत आणली शिवप्रतिमा चे पूजन व सायंकाळी मिरवणूक असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला जातो. पण चालू वर्षीच्या संचारबंदी आदेशामुळे या सर्व कार्यक्रमांना बगल देत गावोगावच्या ग्रामपंचायतींमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळत गावच्या प्रथम नागरिक म्हणून सरपंचाच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी केली .सार्वजनिक शिवजयंती उत्सव रद्द झाला असला तरीही शिवभक्तानी घरोघरी शिवप्रतिमेचे पूजन करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला .सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरव करणारे संदेश देऊन अनेकांनी शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदर व्यक्त केला .मोबाईल व्हॅाट्सअॅपचे स्टेटस वर ही आज शिवछत्रपतींची प्रतिमा सर्वत्र झळकताना दिसून येत होती .
एकंदरीत धडाकेबाज कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती साजरी करता आली नाही तरीही शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे दाखले देत सध्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे संदेश सोशल मीडिया द्वारे देऊन विधायकतेने शिवजयंती साजरी केली.
सांगरूळ येथे सरपंच सदाशिव खाडे ,म्हारुळ येथे सरपंच सर्जेराव पोवार ,खाटांगळे येथे सरपंच दिपाली गुरव, पासार्डे येथे सरपंच वंदना चौगले , आमशी येथे सरपंच बी आर कांबळे ,बोलोली येथे सरपंच सदाशिव बाटे, उपवडे येथे सरपंच सुरेश आरडे, यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली .यावेळी उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .