प्रतिनिधी / सांगरूळ
सांगरूळ तालुका करवीर येथे शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे.येथील मठाचा व भोरजाईचा माळ म्हणून परिचित असणाऱ्या शिवारात बाळासाहेब देसाई या शेतकऱ्यास बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झालेआहे.
बाळासाहेब देसाई यांचा शिवाराच्या या भागात जनावरांचा गोठा आहे. गुरुवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान घराकडून जेवण करून ते जनावरांच्या गोठ्याकडे जात होते. यावेळी बॅटरीच्या प्रकाशात त्यांना वाटेतच या बिबट्या सदृस्य प्राण्याचे दर्शन झाले.त्यांच्यासोबत त्यांनी त्यांची सायकल चालवत आणली होती. ही सायकल त्यांनी वेगाने पुढे ढकलली सोडून दिली. यामुळे सायकल जमिनीवर जोराने आदळली. या आवाजाने संबंधित प्राण्याने रस्त्यातून कुंपणावरून उसाच्या शेतीत उडी मारली. बाळासाहेब देसाई यांनी जनावरांच्या गोठयावर येऊन मोबाईलद्वारे आपल्या मुलांना याची कल्पना दिली.यामुळे गावातील पाच सहा युवक श्री देसाई यांच्या गोठ्यावर आलेत बॅटरीच्या सहाय्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता. त्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे आढळून आलेत.
वनपाल विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कोमल रहाटे यांनी सांगरूळ येथे भेट देऊन या प्राण्यांच्या पायाचे ठसे व शेतामध्ये पडलेले केस यांची पाहणी केली. पायाच्या ठशाचे फोटो व केसांचे नमुने वरिष्ठांना पाठवलेत .शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना एकटे न जाऊ नये व शेतामध्ये वावरताना दक्ष रहावे असे आवाहन ग्रामपंचायतचे वतीने केले आहे .