गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे आमदार जयंत आसगावकर यांच्या सत्कार समारंभात गौरवोद्गार
प्रतिनिधी / वाकरे
प्रा.जयंत आसगावकर यांना आमदार करण्यामध्ये सांगरुळ शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून महाविकास आघाडी आणि आपण विजयाचे शिखर असलो तरी विजयाचा पाया सांगरुळ शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रचला असे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले.
वाकरे फाटा (ता. करवीर) येथील विठाई चंद्राई हॉलमध्ये सांगरुळ शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या पुणे शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या सत्कार समारंभात गृहराज्यमंत्री पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे होते.
गृह राज्यमंत्री पाटील यांनी काँग्रेसचा उमेदवार आमदार करण्याची आपली जिद्द होती आणि म्हणूनच एक जागा द्या निवडून आणतो अशी ग्वाही आपण काँग्रेस पक्षाला दिल्याचे सांगितले. आमदार आसगावकर यांनी भविष्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा कोल्हापूर जिल्हा राज्यात एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये बाराव्या क्रमांकावर आहे, त्यामुळे हा इंडेक्स बदलण्यासाठी शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तावाढीसाठी कार्यक्रम घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या पुढील पिढीसमोरील संकटे आणि पुढील पिढी कशी वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करावा लागेल असे ते म्हणाले. सत्कारमूर्ती नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करताना स्व.डी.डी. आसगावकरांचा वारसा व वसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम केल्याचे सांगून कोल्हापूरचा आमदार करून पुणे मतदार संघाने इतिहास घडवला असे ते म्हणाले.
प्रास्ताविक सांगरुळ शिक्षण संस्थेचे सहसचिव डी. एन. कुलकर्णी यांनी केले. मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर व त्यांच्या पत्नी अनु आसगावकर यांचा सपत्नीक चांदीची मूर्ती, शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. महादेव नरके, पी.के. पाटील शिवाजी पाटील, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भरत रसाळे, विष्णुपंत खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सांगरूळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के.ना.जाधव यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. नीता पोवार यांनी,आभार राजेंद्र गोंधळी यांनी मानले.