सांगली/विशेष प्रतिनिधी
ऑगस्ट 2019मध्ये आलेल्या सांगलीच्या महापुराची आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. सांगलीचा पूर व्यवस्थापन आराखडा बनवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र महासंघ आणि जपान सरकारने घेतली आहे. हा आराखडा बनविण्यासाठी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची जपानने निवड केली आहे. धुमाळ हे येत्या रविवारी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
जपान सारख्या देशास त्सुनामी व भुकंपाचा कायम धोका असतो. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे. सेंदाई फ्रेमवर्क हा त्यांचा जगप्रसिद्ध आराखडा असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्च २०१५ च्या आमसभेत त्याला मान्यता दिली. त्यानुसार जागतीक पातळींवर त्याची अमलबजावणी करण्यासाठी २०१५–२०३० कृती आराखडा करणे प्रत्येक राष्ट्रावर नैतिक बंधनकारक आहे. संयुक्त राष्ट्र महासंघ जपान शासनाने त्याबाबत पुढाकार घेऊन प्रत्येक देशांमधील एका शहराचा आराखडा करून घेण्याचे धोरण ठरविले आहे.
सांगलीला २००५ व २०१९ ला महापुराचा विळखा पडला आणि प्रचंड मोठे नुकसान झाले. त्यामुळे सांगली शहराच्या पुराची जागतीक पातळींवर दखल घेतली गेली आहे. या शहराचा आराखडा बनवून भारतात पूर निवारण करण्याचा एक आदर्श तयार करण्याची युनोची इच्छा आहे. त्यासाठी भारत सरकारकडून अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांचे नामनिर्देशन झाले आहे. त्यानुसार जपान शासनाकडून हेमंत धुमाळ यांना जपानला पाचारण करण्यात आले असून ते रविवारी रवाना होतील.
धुमाळ यांनी २००५ मध्ये सांगलीमध्ये कार्यरत असताना कर्नाटकशी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा सांगली पुराविषयक अभ्यास लेख विशेष गाजला. या लेखाचा जगभरातून नेटवरून डाऊनलोडचा विक्रम झाला आहे. धुमाळ यानी आतापर्यंत २६ आंतरराष्ट्रीय परिषदामधे देशांचे प्रतिनिधीत्व करत शोधनिबंध सादर केले. २०१९ च्या पूरविश्लेषण समितीमधे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पूर पूर्वानुमान व व्यवस्थापन या विषयावर ते सध्या पीएचडी करत असून जपान दौर्यानंतर ती पूर्ण होणार आहे.
जपान शासन त्यांचेकडून सांगलीचा पूर व्यवस्थापन आराखडा तयार करून घेणार आहे. आणि त्याप्रमाणे भारतातील कोल्हापूरसह इतर शहरांचा आराखडा तयार करून संयुक्त राष्ट्र महासंघास कळवला जाणार आहे. या प्रकल्पाला सांगलीमधून सहाय्याची जबाबदारी विनोद मुंजाप्पा, सचिन पवार व सुर्यकांत नलावडे हे कार्यकारी अभियंता तसेच महापालिकेतील सतीश सावंत हे समन्वयाचे काम पाहणार आहेत. त्यांना सुहास पाटील व किरण इंगळे हे तंत्रज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन चव्हाण सहायक म्हणुन काम पाहणार आहेत.