महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांची महिला दिन कार्यक्रमात घोषणा , महापालिकेकडून कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी / मिरज
सांगलीच्या ऐतिहासिक प्रतापसिंह उद्यानात लवकरच पक्षी आणि मत्स्य संग्रहालय सुरू करणार असल्याची घोषणा महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी केली. शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांना महापालिकेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून महापालिका क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलां, तसेच कचरावेचक महिला यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.