श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्हय़ात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूने झालेल्या तुफान गोळीबारानंतर एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले. तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा झालेले जवान हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. राष्ट्रीय रायफल्सचे हुतात्मा झालेले संतोष यादव हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी आहेत. तर, शिपाई रोमित तानाजी चव्हाण हे महाराष्ट्रातील सांगली जिल्हय़ातील शिगावचे (ता. वाळवा) सुपुत्र आहेत. चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
शोपियान जिल्हय़ातील झैनापोरा भागातील जेरमार्गमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती आणि दहशतवाद्यांच्या शोधासाठी एक पथक येथे पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरुच असून सुरक्षा दल सतर्क आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी या चकमकीबाबत माहिती दिली आहे. शनिवारी सकाळी ही चकमक शोपियानच्या झैनापोरा आणि जेरमार्ग भागात सुरू झाली. यादरम्यान, तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दक्षिण काश्मीर हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. अनेकदा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकीच्या घटना समोर येत असतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.
काश्मीर पोलिसांची ट्विटरवरून माहिती
काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी सकाळी ट्विटरवरून चकमकीसंबंधी प्राथमिक माहिती जारी केली होती. लपून बसलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्मयता आहे. संपूर्ण टीम एकत्रितपणे पुढील तपास करत आहे. सध्या हे दहशतवादी कोणत्या गटाशी संबंधित आहेत याची ओळख पटलेली नाही, असे ट्विट पोलिसांनी केले होते.
2022 मधील तिसरा मोठा हल्ला
काश्मीरमध्ये हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी काही अतिसंवेदनशील भागात दहशतवाद्यांचा वावर असलेला दिसतो. सदर संशयितांवर कारवाई करताना चकमकी होत असतात. शोपियानमध्ये शनिवारी झालेला हल्ला हा चालू वर्षातील तिसरा मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वी दहशतवाद्यांनी शुक्रवारी श्रीनगरच्या नौहट्टा भागातील ख्वाजा बाजार येथे ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर त्याआधी 30 जानेवारी रोजी बडगाम आणि पुलवामा जिह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना ठार केले होते.
चौकट
शिगाव गावावर शोककळा
बागणी ः सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण (वय 23) हे देशसेवा बजावत असताना हुतात्मा झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. यामुळे गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाकडून गाव बंद करून तीन दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याची माहिती सरपंच उत्तम गावडे यांनी दिली.
रोमित यांचा जन्म 3 मार्च 1999 मध्ये शिगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात व उच्च शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठ वडगाव येथे झाले होते. बारावी कला शाखेत उत्तीर्ण झाल्यावर ते 2017 मध्ये मुंबई येथे सैन्यदलात भरती झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटर येथे एक वर्ष ट्रेनिंग घेऊन ते चार महार रेजिमेंटल येथून त्यांच्या सेवेला सुरुवात झाली होती. एक वर्षापूर्वी जम्मू काश्मीर येथे ’एक राष्ट्रीय रायफल’ मध्ये त्यांचे पोस्टिंग झाले होते. रोमित यांचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखान्यामध्ये सेवेत कार्यरत आहेत. आई गृहिणी तर बहीण शिक्षण घेत आहे. रोमित चव्हाण यांचे पार्थिव रविवार 20 रोजी सायंकाळपर्यंत मूळ गावी शिगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.