प्रतिनिधी / सांगली
विजयनगर येथील कोरोना संसर्गित रुग्ण ज्या बँकेत कार्यरत होता. ती बँक सोमवारी महापालिका प्रशासनाडून सील करण्यात आली. पुढील १४ दिवस ही बँक बंद राहणार आहे. दरम्यान सील करण्यापूर्वी महापालिकेच्या पथकाने बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. चित्रीकरणात कैद झालेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
शहरातील विजयनगर परीसरात राहणारी एक व्यक्ती कोरोना संसर्गित आढळून आली होती. काही तासातच या व्यक्तीचा मृत्यूही झाला. मनपा क्षेत्रात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ माजली होती. दरम्यान हा रुग्ण शहरातील एका सहकारी बँकेचा कर्मचारी असल्याचे समोर आले होते. महापालिका प्रशासनाने तत्काळ संबंधीत बँकच्या परिसरात औषध फवारणी करत निर्जंतुकीरण केले होते. दरम्यान सोमवारी ही बँकच सील करण्यात आली.
पुढील १४ दिवस ही बँक बंद राहणार आहे. दरम्यान बँक सील करण्यापूर्वी महापालिकेच्या पथकाने बँकेची तपासणी केली. मनपाचे अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि प्रणिल माने यावेळी उपस्थित होते. बँकेतील ८ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीमधील सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हीआर सुद्धा ताब्यात घेतला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून या बँकेत दैनंदिन कामकाज करणारे आणि अन्य नियमित ग्राहक यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.