रविंद्र शिंदे / मुरगूड
मानसिक ताण – तणावातून घराबाहेर पडलेल्या आणि भटकत भटकत मुरगूड शहरी पोचलेल्या एका वृध्देला कोसोमैलदूर असणाऱ्या तिच्या मुलीकडे पोहोच करण्याचे कौतुकास्पद काम मुरगूड येथील युवकांनी केले. महिनाभर ताटातूट झालेल्या मायलेकींची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर ही भेट पाहणार्यांचेही डोळे पानावले. तर ‘आईची भेट घालून देणारे तुम्ही आम्हाला देवदूतासारखे भेटलात ! ‘ हे मुलीचे कृतज्ञ शब्द युवकांना प्रयत्नाचे सार्थक झाल्याचे समाधान देणारे ठरले.
मुरगुडातील तौफिकखान जमादार व तुषार साळोखेसह तरुण मंडळीना बुधवारी रात्री 8 वा.च्या सुमारास गावभागातील मारुती देवालयाच्या पारावर एक वृद्ध स्त्री केविलवाण्या चेहऱ्याने पण मानसिक ताण तणावाखाली विमनस्क अवस्थेत बसलेली दिसली. या महिलेची चौकशी केली असता तिचा नाव पत्ता समजला.तुपारी, ता. कराड येथील अक्काताई निवास गुजले या चिकोर्डे, ता. वाळवा,जिल्हा. सांगली येथे मुलीकडे राहत होत्या. पण भ्रमिष्ट अवस्थेत आपण घराबाहेर पडलो आणि भटकत राहिलो. त्यामुळे प्रचंड थकवा आला. त्यामुळे आपण इथवर पोचल्याचे तीने सांगितले.
वृध्देची ही कर्मकहाणी ऐकून माय-लेकींची भेट घडवून आणण्याचे या युवकांनी ठरवले. योगायोग असा की, चिकोर्डे गावातील एक व्यक्तीचा कामासाठी चार वर्षांपूर्वी घेतलेला फोननंबर तौफिककडे मिळाला. आणि विशेष म्हणजे हा नंबर लागला. युवकांनी वृध्देची माहिती देवून तिच्या मुलीपर्यंत संपर्क साधला. गेली महिना – दीड महिने आईचा शोध घेऊन थकलेल्या मुलीला फोनवरून आईची भेट घडली. आईचा वॉट्स अॅपवरुन फोटो पाठवल्यावर मुलीचीही खात्री झाली. तिने ‘आपण आईला घेऊन जाण्यासाठी निघत असल्याचे सांगून थांबा आम्ही येतो तोपर्यंत आईला जवळच थांबवून घ्या’ अशी विनवणी केली. वृध्देला खाऊ पिऊ घालत व मायेची फुंकर घालत या युवकांनी आर्धी रात्र जागून व प्रतिक्षेत घालवली. पहाटे 2.30 वा. गाडी आली. त्यातून आलेल्या निराधार महिलेची मुलगी आणि जावई यांची झालेली भेट पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. देवदूतरुपाने भेटलेल्या जिद्दी युवकांचे आभार मानत मायलेकी आपल्या गावी परतल्या.