सात कोटींचा आराखडा; ९५ लाखांच्या कामास स्थायीची मंजुरी
प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील टिम्बर एरिया परिसरातील दीड एकर मोकळ्या भूखंडावर भीमा-कोरेगाव येथील क्रांती स्तंभाची प्रतिकृती, कारंजा, माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा, प्राण्यांच्या प्रतिकृतीसह उद्यानाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तब्बल ७ कोटी २१ लाख रुपयांचा हा आराखडा आहे. त्यांपैकी ९५ लाख रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली, असल्याची माहिती सभापती पांडुरंग कोरे यांनी दिली.
ते म्हणाले, टिम्बर एरिया परिसरात महापालिकेचा दीड एकर क्षेत्राचा भूखंड आहे. या भूखंडावर उद्यान, भीमा-कोरेगाव येथील क्रांती स्तंभाची प्रतिकृती, माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा, कारंजासह भव्य उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार आहे. यावर जवळपास ७ कोटी २१ लाख रुपये खर्च होणार आहेत. राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यापैकी पहिल्या टप्प्यात ९५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यास स्थायी सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, असे सांगत सभापती कोरे म्हणाले, महापालिका समाजकल्याण समिती मधून ९५ लाख रुपयांचा निधी उभा करण्यात आला आहे. स्थायीने मंजुरी दिल्याने कामाच्या निविदा लवकरच निघतील. उद्यानाच्या कामास सुरवात होईल. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे कोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, गजानन मगदूम, अनारकली कुरणे आदी उपस्थित होते.