सांगली/प्रतिनिधी
चैत्र पाडव्याच्या निमित्ताने वाचनप्रेमी वाचनालय,सांगली आणि संवादिनी सांगली यांनी पुस्तकाची गुढी उभी केली. गुढीच्या उंची प्रमाणे विचारांची उंची वाढू दे. समाजात वाचनाची चळवळ रूजू दे. वाचन संस्कृतीची पहाट घराघरात होऊ दे हा प्रामाणिक उद्देश ठेऊन पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली.
चैत्र प्रतिपदेच्या सकाळी ९ वा. पुस्तकाच्या गुढीचे पुजन करण्यात आले.यावेळी संवादचे बालचमू,वाचनप्रेमी वाचनालयाचे कार्यकारी महिला मंडळ आणि सभासद, सांगलीच्या संवादिनी यांची उपस्थिती होती.
या निमित्ताने सांगलीच्या संवादिनीनी पुस्तकांचे वाचन केले. तसेच पाडव्यापासून वाचनप्रेमी वाचनालयात दररोज दु.१ ते ३ यावेळेत महिला वाचक तिथेच बसून वाचन करु शकतील अशी सोय करण्यात आली आहे. याचा लाभ महिला वाचकानी घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने विजया हिरेमठ यानी केले आहे.
वाचनप्रेमी वाचनालय महिलांच्या पुढाकाराने सुरु आहे. इथे मोफत पुस्तकांची देवाणघेवाण असते. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाचनालय सुरु असते. या वाचनालयाला महिन्याला शेकडो वाचकप्रेमी भेट देत असतात. त्यात महिला वाचकांची संख्या मोठी आहे.
समाजात वाचन संस्कृती रुजावी.वाचन चळवळीचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचावे या उदात्त हेतूने वाचनप्रेमी वाचनालय आणि संवादिनी सातत्याने एकमेकांच्या सहकार्याने काम करत असतात.
पुस्तकाची गुढी ही संकल्पना दोन वर्षापूर्वीच संवादिनींसमोर अर्चना मुळे यानी मांडली होती. परंतु कोव्हिडमुळे या संकल्पनेला मुर्त स्वरुप देता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे संवादिनीनी ठरवले. पुस्तकाची गुढी उभी करण्यासाठी श्वेता चितळे, सुनदा कदम,माधुरी पोरे,अश्विनी वाघ,अक्षता जोशी,अमृता पवार,निलम बाबर या संवादिनीनी सहकार्य केलं. तसेच संवादचे बालचमू श्रेयस कदम,ईश्वरी हिरेमठ, चिरंतन चितळे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.