प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन 28 रूग्ण वाढले, तर नऊ जण कोरोनामुक्त झाले. एकूण रूग्णसंख्या 617 वर गेली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 303 झाली आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हा जिल्हय़ातील कोरोनाने 16 वा बळी गेला आहे.
सांगली, मिरजेत रूग्णसंख्या वाढतेय
सांगली आणि मिरजेत गेल्या काही दिवसापासून सरासरी दहा रूग्ण वाढले आहेत. शुक्रवारी सांगली शहरातील कोल्हापूर रोडवरील चौगुले प्लॉटमधील चार जण बाधित आढळून आले आहेत. याठिकाणी एका वृध्देला कोरोनाची लागण झाली होती तिच्या कुटुंबीयातील हे सर्व सदस्य आहेत. अरिहंत कॉलनी येथील नवी मुंबई येथून आलेला एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. असे पाच रूग्ण सांगलीत वाढले आहेत. तर मिरज शहरात रेवणी गल्ली येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एक व्यक्ती आणि दोन महिला आहेत. तर रमामाता नगर येथे दोन रूग्ण वाढले आहेत. या दोन्ही महिला आहेत.
दुधोंडी हॉटस्पॉटमध्ये सहा
पलूस तालुक्यातील दुधोंडी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी नवीन सहा रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये चार व्यक्ती आणि दोन महिला आहेत. तर वाळवा येथील खेडमध्ये एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे. ती सांगली शहरातील सावली बेघर केंद्रात राहत होती. पण, तिच्या मुळगावी तिची नोंद घेण्यात आली आहे. सावली बेघर केंद्र आता सील करण्यात आले आहे. तर वाळवा शहरात दोन महिला आणि दोन व्यक्ती यांचा समावेश आहे. तर इस्लामपूर शहरात दोन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये एक महिला आणि एक व्यक्ती आहे. मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे दोन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. जत तालुक्यतील उमदी येथे एकजण शिराळा येळापूर येथील एक आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील एक व्यक्ती बाधित आढळून आला आहे. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हय़ात नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्य़ा आता नऊने कमी झाली असून सध्या उपचारात 303 रूग्ण आहेत. याशिवाय परजिल्हय़ातील 30 रूग्णांच्यावर मिरजेत उपचार सुरू आहेत. शुक्रवारी परजिल्हय़ातील दोन नवीन रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 16 वा बळी
पलूस तालुक्यातील नागठाणे येथील 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सदरची व्यक्ती दोनच दिवसापूर्वी कोरोनाबाधित झाली होती. भारती हॉस्पिटल येथे त्यांच्यावर हृदय़शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच त्यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. हा जिल्हय़ातील कोरोनाचा 16 वा बळी गेला आहे.
12 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 12 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये सांगली येथील 78 वर्षीय महिला, जुना बुधगाव रोडवरील 65 वर्षीय व्यक्ती, कानकात्रेवाडी येथील 48 वर्षीय व्यक्ती, नेलकरंजी येथील 55 वर्षीय व्यक्ती, दरिबडीची येथील 28 वर्षीय युवक, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, उमदी येथील 40 वर्षीय व्यक्ती, मिरज येथील 73 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 38 वर्षीय व्यक्ती या नऊ जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील तीन रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 617
बरे झालेले 298
उपचारात 303
मयत 16