बाजारात चिक्की गुळाला मागणी वाढली
प्रतिनिधी / सांगली
मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर गुळवडी, पोळी, तिळपापडी तसेच लाडू तयार करण्यासाठी बाजारात चिक्की गुळाची मागणी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे उत्पादन घटले असून मागणी अधिक असल्याने दरात वाढ होत आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाला क्विंटलला उच्चांकी 5100 रुपयांचा भाव मिळाला. गुळ उत्पादक शेतकर्यांनी आपला माल सांगली मार्केट यार्डामध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी नवीन वर्षाच्या प्रारंभी (चिक्की) गुळास उंच्चाकी 5100 रुपये क्विंटलला भाव मिळाला आहे. पंचलिगेश्रवर आणि कंपनी या दुकानामधील गुळाच्या सौद्यामध्ये शेतकरी सुरेश मारूती पुणेकर (रा.निडगुंदी, जि. बेळगाव) यांच्या चिक्की गुळास अर्धा किलो बॉक्स पॅकिंगमधील चिक्की गुळास दर मिळालेला आहे. सदरचा चिक्की गुळ श्री वीर ट्रेडर्स सांगली यांनी खरेदी केला आहे. गुळ सौदयामध्ये गुळ भेलीस व गुळ रव्यास क्विंटलला कमीत कमी 3300 रुपये व जास्तीजास्त 3920 रुपये इतका दर मिळाला. सणाच्या पार्श्वभूमीवर गुळवडी, पोळी, तिळपापडी तसेच लाडू तयार करण्यासाठी बाजारात चिक्की गुळाची मागणी वाढली आहे. गुळ सौदयासाठी आडते, व्यापारी, खरेदीदार, अमरसिंह देसाई-बिळगे, विपूल मेहता, राजेश मुदडा, राजेंद्र पाटील, हमाल बांधव, तोलाईदार व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
गुळ उत्पादक शेतकर्यांनी आपला गुळ जास्तीत जास्त विक्री साठी सांगली कृषभ उत्पन्न बाजार समिती सांगली येथे घेऊन यावा. शेतकर्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद, बेदाणा, शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पाटील व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.