प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला आज, शुक्रवारी शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शुक्रवार 11 ते 21 सप्टेंबरअखेर हा जनता कर्फ्यू असणार आहे. जनता कर्फ्यूची सक्ती नसल्याने पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद करण्यावरून व्यापाऱ्यांच्यामध्ये अगोदरच दोन गट पडले होते त्याचा परिणाम जनता कर्फ्यू मध्ये दिसून आला.
यामध्ये गजबजलेल्या दत्त मारुती रोड, कापड पेठ, शिवाजी मंडई, गणपती पेठ, हरभट रोड, स्टेशन रोड, विश्रामबाग कॉलेज कॉर्नर आदी प्रमुख ठिकाणी अनेक दुकाने बंद तर काही दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. शिवाजी मंडई येथेही काही भाजी विक्रेत्यांनी त्यांची दुकाने सुरूच ठेवली होती. दरम्यान दुकाने सुरू बंद असा प्रकार असला तरी शहरवासीयांनी मात्र जनता कर्फ्यू ला चांगला प्रतिसाद दिला.
रस्त्यावर दुचाकी वाहनांची संख्या कमी दिसून येत होती.पेट्रोल पंप सुरू होते तथापि फारशी गर्दी नव्हती.सांगली शहराला लागून असलेल्या माधवनगर शहरांमध्येही जनता कर्फ्यू ला चांगला प्रतिसाद मिळाला.माधव नगर मध्ये मेडिकल दवाखाने वगळता अन्य सर्व व्यवहार कडकडीत बंद होते.