संजय गायकवाड / सांगली
महापालिकेच्यावतीने सांगलीतील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर रणजी क्रिकेटचे सामने घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून आयुक्त नितीन कापडणीस यांचा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सांगलीतील राज्य क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱयांमार्फत बीसीसीआयकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. बीसीसीआयने जर सांगलीत रणजी क्रिकेटचे सामने घेण्यासाठी परवानगी दिली तर येत्या वर्षभरात सांगली शहर व जिल्हय़ातील क्रिकेट रसिकांना देशभरातील दिग्गज क्रिकेट खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
महापालिकेची सांगलीत शिवाजी स्टेडीयम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम अशी दोन स्टेडीयम आहेत. शिवाजी स्टेडीयमवर स्थानिक क्रिकेटबरोबरच ऍथलेटिक्स अशा काही छोटय़ा मोठय़ा स्पर्धा होतात. पण, आंबेडकर स्टेडीयमवर मात्र कोणत्याही सुविधा नसल्याने येथे कोणत्याच स्पर्धा घेता येत नाहीत. आयुक्त नितीन कापडणीस यांनी नव्या वर्षात मात्र सांगलीच्या विशेषतः क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिवाजी स्टेडीयमवर रणजी क्रिकेटचे सामने घेण्याबाबत मनपाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी बीसीसीआयकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रणजी क्रिकेटसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. यात स्टेडीयमची बैठक व्यवस्था तसेच खेळपट्टीची सुधारणा आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. क्रिकेटसह येथे ऍथलेटिक्स व अन्य सर्व प्रकारच्या स्पर्धा घेण्याच्या दृष्टीनेही मनपाचा प्रयत्न आहे. शिवाजी स्टेडीयमवर रणजी क्रिकेटबरोबरच 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील व 18 वर्षाखालील अशाही क्रिकेटच्या राज्यस्तरावरील स्पर्धा तसेच महापौर चषक कुस्तीसह जिल्हा परिषदेच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील क्रीडा संघटक व खेळाडू यांना पुरस्कार आणि इनडोअर गेमसाठीही यंत्रणा उभी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
सचिन तेंडूलकर यांच्यासह दिग्गजांचे सांगलीला पाय
दरम्यान, शिवाजी स्टेडीयमवर रणजी क्रिकेटचे सामने घेणे शक्य असून सांगलीमध्ये काही वर्षापूर्वी वालचंद अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्यावतीने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी स्टेडीयमवर एक मैत्रीपूर्ण क्रिकेटचा सामना झाला होता. त्यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, श्रीलंकेचा माजी तडाखेबाज फलंदाज सनथ जयसूर्या, अजय जडेजा आदी काही दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सांगलीकरांना मिळाली होती. त्यानंतर महापालिकेच्यावतीने a शिवाजी स्टेडीयमवर यापूर्वी एकदा महापौर चषक क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्येही भारताचा माजी सलामीवीर अतुल बेदाडे यांच्यासह काही दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सांगलीकरांना मिळाली होती. आता जर रणजी सामन्यांना परवानगी मिळाली तर क्रिकेट रसिकांना यानिमित्ताने देशभरातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. अर्थातच यासाठी बीसीसीआयचा हिरवा कंदील मिळणे आवश्यक आहे