सांगली प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून शांत असणारी हिसडा टोळी पुन्हा एकदा कार्यरत झाली आहे. या हिसडा टोळीने मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजता एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली आहे. आठ ग्रॅम वजनाची १२ हजार रूपये किमतीची ही चेन हिसडा मारून लांबविली आहे. याबाबत वेदिका प्रदीप पाटगावकर रा. वृंदावन व्हिलाज, विश्रामबाग सांगली हिनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी वेद्रिका पाटगावकर ही शिक्षणासाठी पुणे येथे राहते. ती सांगलीत आई वडिलांना भेटण्यासाठी आली होती. काही कामानिमित्त ती आणि तीची वहिनी दुचाकीवरून बाहेर गेल्या होत्या. पावणेतीनच्या सुमारास दुचाकीवरून त्या दोघी घराकडे येत असताना वृंदावन व्हिलाज रोडवरील रेशीमगाठी मंगल कार्यालयासमोर एक युवक स्पैलंडर या दुचाकीवरून एकदम त्यांच्या जवळ आला आणि त्याने वेदिका हिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. हा दुचाकीस्वार वृंदावन व्हिलाज समोरून मिरजेकडे निघून गेला. ही घटना अचानक घडल्याने वेटिका आणि तिची बहिनी घाबरली त्यांनी आरडाओरडाही केला पण तोपर्यंत तो दुचाकीस्वार पळून गेला.
दरम्यान वेदिका हिने ही माहिती घरच्यांना दिली. कुंटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला आहे. विश्रामबाग पोलीसांनी तात्काळ या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच रेकॉर्डवरील हिसडा टोळीच्या सदस्यांचा शोध सुरू केला आहे.