कुरळप / वार्ताहर
करंजवडे तालुका वाळवा येथील करंजवडे ते ऐतवडे बुद्रुक रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघात घटनेची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
रवींद्र विनायक किराणे असे मयत तरुणाचे नांव तर राहुल सुरेश जगदाळे असे जखमी युवकाचे नांव आहे. सध्या दोघेही करंजवडे इथे रहात होते. मयत रवींद्र किराणे याचे मुळ गांव कुरळप तालुका वाळवा हे असून तो करंजवडे येथे मामाच्या गाावी राहात होता.
कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रवींद्र विनायक किराणे हा सेंट्रिंगचे काम करत असल्याने करंजवडे येथील मामाकडे वास्तव्यास होता. मंगळवार दि.१३ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान काम संपवून मोटर सायकल क्र. एम एच ०८ एन ५१४३ वरून करंजवडे येथील मित्र राहुल सुरेश जगदाळेसह ऐतवडे बुद्रुकहुन करंजवडेकडे येत होता. करंजवडे गावालगत आल्यानंतर पाठीमागून आलेल्या चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, रवींद्र किराणे जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेल्या मित्र जगदाळे याला गंभीर दुखापत झाली आहे.
रवींद्र हा एकुलता एक असल्याने आईचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते. अज्ञात वाहन चालका विरोधात कुरळप पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास कुरळप पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.