स्मशानभूमीत दफनभूमीसाठी पैसे मागितले जात असल्याने लिंगायत समाज आक्रमक
प्रतिनिधी / मिरज
महापालिकेने ठेकेदाराची बिले अडविल्याने शहरातील लिंगायत समाजाला तीन हजार रुपये शुल्क भरुन दफनविधी करावा लागत आहे. अन्य समाजाला मोफत अंत्यविधी करण्याची सोय असताना लिंगायत समाजाकडे पैसे मागितले जात असल्याने हा अन्याय आहे. महापालिकेने ठेकेदाराची बिले अदा करुन लिंगायत स्मशानभूमीत मोफत अंत्यविधीची सोय न केल्यास लिंगायत समाजातील मृतदेह महापालिकेत आणून ठेवले जातील, असा इशारा शहरातील लिंगायत समाज बांधवांनी दिला आहे. सोमवारी नगरसेवक गणेश माळी, भाजपाचे शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते महादेव कुरणे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाज बांधवांनी महापालिकेवर मोर्चा काढून मागणीचे निवेदन दिले.
संबंधित लिपिकावर कारवाई करु
लिंगायत समाजातील अंत्यविधी मोफत करण्यासाठी आयुक्तांनी यापूर्वीच आदेश दिले आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये काही कर्मचाऱ्यांनी चुका केल्या असल्याचे दिसून येते. ठेकेदाराने संबंधीत विभागाकडे बिलाची फाईल दिली आहे. पण, ती फाईल वरिष्ठांपर्यंत आली नाही. संबंधीत विभागाकडून फाईल प्राप्त झाल्यास ती तात्काळ मंजूरीला पाठवून बिल अदा करु. बिलाची फाईल गहाळ करणाऱ्य लिपिकावर कारवाई करु.
स्मृती पाटील, महापालिका उपायुक्त