जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आटपाडीत दक्षता
प्रतिनिधी/आटपाडी
आटपाडी तालुक्यात मुंबई, पुण्यासह कोरोना संसर्गाची अधिक व्याप्ती असलेल्या भागातुन आलेल्या 50 वर्षावरील लोकांचे स्वॅब घेण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. आटपाडी तालुक्यातील कोरनटाईन केलेल्या 77 लोकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.
आटपाडी तालुक्यात आतापर्यंत 21 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर झरे येथील एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्यू झालेली महिला पन्नाशी पार आहे. सांगली जिल्ह्यात पन्नाशी ओलांडलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरून आलेल्या आणि अलगीकरण केलेल्या वय वर्ष 50 च्या पुढील लोकांचे स्वॅब घेण्याचे, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने 22 मे पासून आटपाडी तालुक्यात आलेल्या आणि अलगीकरण केलेल्या लोकांवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. जवळपास पावणे दोनशे लोक अशा यादीत आहेत. पैकी 77 लोकांचे स्वॅब आटपाडी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले. उर्वरित लोकांचे हे स्वॅब घेण्यात येणार आहेत.
याशिवाय अशा लोकांना मधुमेह, रक्तदाब यासह अन्य आरोग्य समस्या असल्यास त्यांची रक्त तपासणी करण्यासह अन्य चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साधना पवार यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी व आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बाहेरून आलेल्या अलगिकरण केलेल्या 50 वर्षावरील लोकांच्या आरोग्य बाबत विशेष काळजी घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे.