आटपाडी / प्रतिनिधी
सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आटपाडी पोलिस ठाण्याला नवी इमारत उभारण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली.
आटपाडी येथील पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्र्यांनी दिले. तर खानापूर येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन करणेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मंत्रालयात ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारत बांधकामाच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस जगन्नाथन आदी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार अनिल बाबर यांनी आटपाडी पोलीस ठाण्याची इमारत जुनी असून तेथे नवीन इमारतीची गरज विशद केली त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव देण्याचे आदेश दिले.