वार्ताहर / आष्टा
आष्टा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा जनार्दन पेटारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तेजश्री बोंडे यांनी कार्यकाल संपल्याने उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
आष्टा पालिकेच्या कै. काकासो शिंदे सभागृहात ही निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा पेटारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी काम पाहिले. प्रतिभा पेटारे यांच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सूचक म्हणून नगरसेवक विशाल शिंदे तर अनुमोदक नगरसेवक झुंझारराव पाटील हे होते. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.