प्रतिनिधी / सांगली
पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपावर आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले कि, मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेची पुन्हा एकदा फसवणूक केली आहे. इंधनाचे दर सर्वसामान्य जनतेला परवडतील असे जाहीर करावे अन्यथा युवक काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल. शहर अध्यक्ष सुहेल बलबंड म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्वसामान्य जनतेने आपले रोजगार गमावले आहे. त्यांच्या घरातील चूल पेटणे कठीण झाले आहे आणि अशातच मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवल्याने सर्व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलचे दर पन्नास रुपये वरून पंचावन्न रुपये झाले होते त्यावेळी भाजपने देशभरात आंदोलने केली होती. आता त्याच मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर दुप्पटीने वाढवले आहे मग आता ते भाजपचे नेते, कार्यकर्ते मुग गिळून गप्प का बसले आहेत. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवल्याने सर्वसामान्य जनतेवर चालत फिरण्याची वेळ आली आहे.
यावेळी संभाजी पाटील, उत्कर्ष खाडे, आशिष चौधरी, प्रथमेश जाधव, अरबाज शेख, शैलेश शेजाळ, ताजुद्दीन शेख, शुभम हुलवाणे, तौफीक शिकलगार, प्रशांत अहिवळे, गौरव गायकवाड, हिरा कांबळे, ओंकार कांबळे, अजय माने आदी उपस्थित होते.