प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील डॉ.सचिन सांगरुळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटलमधील हालगर्जीपणा,वाढता वैद्यकीय खर्च याबाबत तक्रारी झाल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखालील तज्ञ समितीने अचानक भेट देवून सखोल चौकशी केली. मंगळवारी रात्री या समितीने ही कारवाई केली. दरम्यान काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल गुरुवार पर्यंत येईल, असे डॉ.साळुखे यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
डॉ.सांगरुळकर यांचे हॉस्पिटल व कोवीड सेंटर पेठ- इस्लामपूर रस्त्याला असून गेल्या काही दिवसांपासून येथे रुग्ण दगावल्याने सेवेबाबत शंका निर्माण झाली आहे. कापूसखेड येथील तरुण धोंडीराम वसंत पाटील(३५) यांचे उपचार घेताना निधन झाले. त्यांची पत्नी रुपाली व भाऊ गणेश यांनी डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे धोंडीराम यांचा मृत्यू झाला असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले. दरम्यान पाटील यांच्या उपचाराची फाईल मागणी करण्यास गेलेल्या पाटील कुटुंबियांना व काही पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी डॉ.सांगरूळकर, त्यांच्या पत्नी नैनीशा सांगरुळकर व कर्मचाऱ्यांनी उध्दट वागून शिवीगाळ केली.
या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे नोंद झाले. काही सामाजिक संघटना व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच पाटील कुटुंबीयांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.त्यानंतर आरोग्य विभागाने चौकशी केली.