प्रतिनिधी / सांगली
कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोरोना संसर्ग झाल्यास तातडीने उपचार मिळण्यासाठी अथवा त्यांची योग्य पध्दतीने काळजी घेण्यासाठी उद्योजक संघटनांनी कोविड केअर सेंटर उभारण्यास प्राधान्य द्यावे किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारावे. त्याचबरोबर बाधित कामगारांच्या कुटुंबांसाठीही आयसोलेशन सेंटर उभारून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांसाठी कोरोनाच्या अनुषंगाने असणाऱ्या सोयी सुविधा व उद्योग क्षेत्रात असलेली कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापक विद्या कुलकर्णी, विविध उद्योग संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.