लहान भाऊ बचावला : मोलमजुरी करणाऱया ऐवळे कुटुंबावर काळाचा घाला
वार्ताहर/उमदी
उमदी (ता. जत) येथे ओढा पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. रेणुका शिवानंद ऐवळे (वय 7) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय 11) अशी या बहिणींची नावे आहेत. तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय 6) हा बचावला गेला.
अधिक माहिती अशी की, ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसापासून उमदी गावात ओढÎालगत असणाऱया घरात रहात होते. रविवारी सकाळी घरातील सर्व लोक दुसऱयांच्या शेतात मोलमजुरीसाठी गेले होते. दोन मुली व एक मुलगा यांना घरात सोडले होते. दुपारी अंघोळ करण्यासाठी दोन्ही बहिणी व एक भाऊ असे तिघे मिळून वडापात्रात गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका व लक्ष्मी या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या सोबतच गेलेला लहान भाऊ मायाप्पाने दोन्ही बहिणीला पाण्यात बुडताना पाहून आरडा-ओरडा सुरू केला. यावेळी तोही पाण्यात पडला. त्यावेळी ओढÎालगत जनावरे राखणारा संभाजी माने व प्रकाश वाघमारे यांनी पाण्यात उडी मारली. परंतु दुर्दैवाने मुलींचा मृत्यू झाला होता. तर लहान भाऊ मायप्पा यास वाचवण्यात यश आले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.