स्थायीत निविदा काढण्यास मंजुरी; तीन महिन्यात कामास सुरुवात
प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रातील प्रमुख चौक, रस्ते, जोडरस्ते एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने लवकरच उजळणार आहेत. त्यासाठी ६० कोटी रुपयांच्या प्रस्तावास आज स्थायी समितीमध्ये एकमताने मान्यता देण्यात आली. येत्या तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होईल. सहा महिन्यात सर्वत्र एलईडी दिवे बसविण्यात येतील अशी माहिती सभापती पांडुरंग कोरे यांनी दिली. तब्बल ३३ हजार एलईडी दिवे महापालिका क्षेत्रात बसविण्यात येणार असल्याचे कोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कोरे म्हणाले, संपूर्ण महापालिका क्षेत्रात एलईडी दिवे बसविले जाणार असून या प्रकल्पाचा खर्च ६० कोटी रुपये अपेक्षित आहे. एलईडी प्रकल्पासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल ४५ अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. यात ठेकेदाराने बंद पडलेला एलईडी २४ तासात न बदल्यास प्रतिदिन शंभर रुपये दंड, कोणत्याही कारणांनी विद्युत वाहिनीचे नुकसान झाल्यानंतर ती वाहिनी निर्धारित वेळेत पूर्ववत न केल्यास ५०० रुपये प्रतिदिन दंडाची अट घातली आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी निश्चित केला आहे. बैठकीत यासाठी निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होईल.