महापुराच्या धास्तीने महत्वाची कागदपत्रे, साहित्य हलवले
प्रतिनिधी / सांगली
शहरात यंदा पुन्हा महापुराची परिस्थिती उद्भवली असल्याने त्या अनुषंगाने शुक्रवारी दिवसभर एसटीच्या सांगली विभागात असलेल्या एकूण ९८ बसेसमधील ८८ बसेस इतरत्र डेपोमध्ये हलवण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक दिपक हेतंबे यांनी दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने यंदा पुन्हा महापुराची परिस्थिती असल्याने सर्व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. कृष्णा नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. ती ५० ती ५२ फूट होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली असल्याने, सांगली एसटी विभागात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम सुरु झाले आहे. नुकतेच शुक्रवारी सकाळी महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य इतरत्र हलवण्यात आले. तसेच एसटी विभागातील एकूण ९८ बसेसमधील फक्त १० बसेस सांगली डेपोत ठेवण्यात आल्या आहेत. तर सुमारे ८८ बसेस इतरत्र डेपोमध्ये हलवण्यात आल्या. यातील काही बसेस तासगाव, विटा, मिरज आगार व चंदनवाडी येथील कार्यशाळा येथे पाठवण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
२०१९ च्या सांगलीतील पुराचा व नुकत्याच झालेल्या चिपळूणच्या प्रलयाचा अनुभव पाठीशी असल्याने सांगलीतही तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सांगली आगारातील महत्त्वांच्या कागदपत्रे व साहित्यांसह सुमारे ८८ बसेस इतरत्र हलवण्याचे काम सुरु करण्यात आले.-दिपक हेतंबे, सांगली एसटी आगार व्यवस्थापक.