सांगली / प्रतिनिधी
कोव्हीड १९ आजारामुळे सध्या कचरावेचक महिलांचे अत्यंत हाल होत असून रोजगार संपला आहे. तसेच कचरावेचकांना उपासमार सहन करावी लागत आहे. यामुळे अवनी संस्थेच्या नेतृत्वाखाली कार्यरत तीनशे महिलांनी कचरा वेचण्यासाठी ठेके त्यांनाच देण्यासह विविध मागण्यांसाठी एस एम एस आंदोलन केले आहे.
प्रशासनाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कचरावेचक महिलांच्या बचत गटांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी तसेच स्थायी सभापती यांना एसएमएसद्वारे आपल्या मागण्यांचे एक निवेदन पाठवले. यात केलेल्या मागण्या अशा ८ एप्रिल २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार शहरातील कचरावेचक महिलांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाच्या कामाचा ठेका द्यावा.
कचरावेचकांना वॉर्डनुसार कचरा संकलन केंद्र उपलब्ध करून द्यावे. कचरावेचक कुटुंबातील मुलांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची रक्कम ३००० इतकी मुलांच्या खात्यामध्ये जमा करावी. शहरातील कचरावेचकांना ओळख पत्र देण्यात यावे. या आंदोलनाचे नेतृत्व अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, प्रकल्प समन्वयक जैनुद्दिन पन्हाळकर, सहकारी सोनाली कांबळे, अभिजीत जाधव आदिंनी केले.