२४ लाखाचा ठेका एका वर्षातच ७४ लाखावर कसा गेला ? ४ लाखाला मिळणारी घंटागाडी ६ लाखाला खरेदी कशी केली ?
कडेगाव / प्रतिनिधी
कडेगाव नगरपंचायतीचे भाजपाचे नगरसेवक नितिन शिंदे यांनी कडेगाव नगरपंचायतीच्या मनमानी कारभारा विरुद्ध आमरण उपोषण करण्याचा ईशारा प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसिलदार डॉ. शैलजा पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे देण्यात आला.
प्रांताधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कडेगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्र १७ चे नगरसेवक या नात्याने प्रतिनिधित्व करीत आहे. माझ्या प्रभागातील विविध समस्यांबाबत वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाला अर्ज व विनंती करून अडचणीची सोडवणूक करीत असतो.
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अनुदान या योजनेअंतर्गत डॉ. रेणूशे हॉस्पिटल ते युवराज राजपूत घर मार्गे वडतूकाई मंदिर पर्यंत गटर व रस्ता कामासाठी रु २० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्ता हा प्रभाग क्र १६ व १७ च्या मध्यातून जातो. शासन नियमानुसार या संपूर्ण रस्त्याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागास देणे गरजेचे होते परंतु डॉ. रेणूशे हॉस्पिटल ते युवराज राजपूत घरमार्गे अर्ध्यावर शंभूराजे चौकापर्यंत रस्ता मोजणी केली आहे. व राहिलेल्या मोजमापात प्रभाग १६ मधील गटरचे मोजमाप घेतले गेले आहे. या गटरातील सांडपाणी लघु पाटबंधारे तलावाच्या कॅनल मध्ये सोडले जाणार आहे, ही बाब माझ्या लक्षात येताच मा. मुख्याधिकारी यांना दि २१.०६.२०२१ रोजी तक्रार अर्ज देऊन याबाबत माहिती करून दिली होती.
आत्मदहन किंवा उपोषण केल्यावरच रस्ता मिळेल का ? अशी विचारणाही केली होती. लोकहिताचा विचार करून माझ्या मागणीप्रमाणे रस्ता झाला तर स्वपक्षातील नगरसेवक नाराज होतील. त्यापेक्षा पक्षातील नगरसेवकांची मर्जी राखून विरोधकांची कामे टाळली व कितीही गैरव्यवहार केले तरी आपणास कोणीही विचारणार नाही, अशी धारणा मा यांची झालेली आहे. त्यामुळे ते माहिती देत नसतील किंवा मुग गिळून गप्प बसले असतील.
तरी शासन आदेशानुसार डॉ. रेणूशे हॉस्पिटल ते युवराज राजपूत घर मार्गे वडतूकाई मंदिर पर्यंत रस्ता पूर्ण करणे कामी आदेशित करावे. याबाबत आपणाकडून मला दि २० जुलै २०२१ पर्यंत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा दि २३ जुलै २०२१ पासून न्याय मिछळेपर्यंत नगरपंचायत. कडेगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहे .असा इशारा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.